Entertainment • Marathi

‘ती एकटी नाही!’ महिलांवरील अत्याचाराविरोधात स्त्रीशक्तीचा थरारक जागर; डार्क-सुपरनॅचरल शॉर्ट फिल्म चर्चेत

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि समाजातील वाढते अत्याचार यावर भाष्य करणाऱ्या एका वेगळ्या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. डार्क, सोशल अवेअरनेस आणि सुपरनॅचरल संकल्पनेवर आधारित या कथेत महिलांना कमजोर समजणाऱ्या मानसिकतेविरोधात स्त्रीशक्तीचा आवाज दाखवण्यात आला आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर “सरकार न्याय देईल का?” असा सवाल उपस्थित केला जातो. त्याचवेळी अत्याचारी मानसिकतेचा वैभव शिंदे हा तरुण कोणालाही आपल्याला थांबवता येणार नाही, असं आव्हान देतो.

यानंतर रात्री संध्या मांडवकर ही तरुणी घरी जात असताना तिचा पाठलाग सुरू होतो. याचदरम्यान तिला एक छोटी मुलगी दिसते. त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताना परिस्थिती अधिक गंभीर बनते.

मात्र, पुढे या कथेत एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळतो. युविका शिवलेने साकारलेली छोटी मुलगी ही साधी मुलगी नसून देवीशक्तीचं प्रतीक असल्याचं समोर येतं. तिच्यासमोर वैभवचं असुरी रूप उघड होतं आणि दोघांमध्ये संघर्ष होतो.

साक्षी सावंतने साकारलेली देवीशक्ती स्त्रीच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. “मी एकटी नाही, माझ्यामागे प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक स्त्रीची शक्ती आहे,” असा प्रभावी संदेश या कथेतून देण्यात आला आहे.

महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि अत्याचाराविरोधात समाजाने आवाज उठवावा, हा या शॉर्ट फिल्मचा मुख्य उद्देश आहे. ही केवळ एका मुलीची कथा नसून, भीतीमुळे आपला आवाज दाबून ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कथा असल्याचा संदेश निर्मात्यांनी दिला आहे.

या प्रोजेक्टमध्ये वैभव शिंदे, साक्षी सावंत आणि संध्या मांडवकर यांच्या प्रमुख भूमिका असून युविका शिवलेने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.

Add Comment

Click here to post a comment